कृषी

काळी मिरी लागवड माहिती : Plantation Of Black Pepper In Marathi

Black Pepper In Marathi । काळी मिरी लागवड माहिती । black pepper plantation । काळी मिरी लागवड। black pepper plant care। black pepper farming। काळी मिरी माहिती । काळी मिरी रोग नियंत्रण

Table of Contents

काळी मिरी माहिती प्रस्तावना

रघुवंश काव्यात मिरीचा उल्लेख आहे.

मारीचोद्भ्रांतहारीता मलयाद्रेरुपत्यकाः।

मलयाद्रीच्या पायथ्याच्या रानात मरीच पुष्पांच्या उग्रगंधाने हारीत पक्षी भांबावून गेले होते. पौराणिक काळी भारताच्या दक्षिण टोकाकडील पर्वताला मलयाद्री म्हणत असत.

प्राचीन काळापासून भारतीय मिरी जगप्रसिद्ध आहे. त्याचे मूलस्थान भारताच्या दक्षिण पश्चिमेकडील डोंगरात आहे. तेथे अद्यापही रानटी मिऱ्याच्या वेली आढळतात. मिऱ्याला मसाल्याची राणी म्हणतात.

मिरी मसाल्याची राणी

कारण जगभर लोकांच्या आहारात त्यांना महत्वाचे स्थान आहे. मिऱ्याचे लागवडीच्या क्षेत्रात भारताचा जगात पहिला क्रमांक होता. भारतात सुमारे १.०६ लाख हेक्टरमध्ये मिऱ्याची लागवड होते. पण आता भारताची मक्तेदारी संपली असून मिऱ्याचे उत्पादनात जगात भारताचा पाचवा क्रमांक लागतो. १९३३ सालपासून ब्राझीलमध्ये मिऱ्याची लागवड सुरू झाली आहे. त्याशिवाय श्रीलंका, मलेशिया, थायलंड, फिलीपीन्समध्येही मिऱ्यांचे उत्पादन होते. जागतिक बाजारपेठेत भारतीय मिरी मलबार, अलेप्पी व तेलीचेरी नावाने प्रसिद्ध आहेत. मिऱ्यांचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा १६% आहे. भारतातील मिऱ्यांचे उत्पादन दरवर्षी कमी जास्त होते. – ४०,००० मे.टन ते ६५,००० मे. टनापर्यंत ते प्रमाण जाते. प्रति हेक्टरी उत्पादन सरासरी अवघे २०० कि.ग्रॅ. आहे.

Plantation Of Black Pepper In Marathi

भारतातील प्रति हेक्टरी उत्पादन कमी असण्याची कारणे

मिऱ्यांच्या अनेक जाती आणि त्यापैकी बऱ्याच कमी उत्पादन देणाऱ्या, वेलींची दाटी, जिवंत झाडांच्या सावलीत लागवड, पिकाची योग्य काळजी न घेणे, रोगामुळे (विशेषतः मर रोगामुळे ) होणारे पिकाचे नुकसान. भारतीय मिऱ्यांचे ९६% उत्पादन केरळात होते. केरळमध्ये हे पीक मुख्यतः परसबागेत घेतात. कर्नाटकात ३.५% उत्पादन होते. बाकीचे तमिळनाडू, असाम, बंगाल, गुजरात व पाँडेचरीमध्ये होते. भारतातून दरवर्षी सुमारे ६०,००० टन मिरी निर्यात होते आणि त्यापासून बऱ्यापैकी परकीय चलन मिळते. मिऱ्यांची लागवड कोकणात होऊ शकते. नारळ सुपारीच्या बागेत ही लागवड केली पाहिजे.

हवामान –

मिरी हे दमट व उष्ण हवामानात वाढणारे पीक आहे. उत्तम वाढ होण्यासाठी दमट उष्णता आणि वर्षभर विखुरलेला पाऊस २५० से.मी. किंवा त्याहून अधिक लागतो. हे पीक समुद्रपातळीपासून १२०० मीटर उंचीपर्यंत वाढते. केरळात पावसाचे पाण्यावर हे पीक येते. म्हणून पावसात फार दिवस खंड पडला तर पिकाचे उत्पादनावर परिणाम होतो. वार्षिक पाऊसमान १२५ से.मी.पेक्षा कमी असू नये. पावसाचे पाण्याने फुलांचे परागीकरण होते. म्हणून वेलींना फुलांचा बहार येतो त्या काळात पावसाच्या सरी पडल्या पाहिजेत. कमाल तापमान ४० अंश सें. आणि किमान तापमान १० अंश असावे. समुद्रसपाटीपासून ५०० मीटर उंचीवर हे पीक चांगले वाढते.

काळी मिरी लागवड जमीन –

मिरीच्या लागवडीसाठी भरपूर अन्नद्रव्ये व सेंद्रीय द्रव्ये असलेली नवीन जमीन उत्तम असते. जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा व्हावा. अशा जांभ्या खडकाच्या तांबड्या जमिनीत किंवा नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक घेतात. जमिनीची खोली १.२ ते १.५ मीटर असावी. त्याखाली खडक असावा. जमिनीत खडेगोटे असावेत. उन्हाळ्यात जमीन कोरडी पडू नये. त्यामुळे वेली मरतात. पावसाचे पाणी वेलीजवळ साचून राहू नये. केरळात तांबड्या किंवा रेताड पोयट्याच्या जमिनीत, नदीच्या काठावरील गाळाच्या जमिनीत लागवड करतात. पावसाचे पाणी साचत नाही. पश्चिमेच्या उतारावर वेलींचे कडक उन्हापासून संरक्षण करावे लागते.

मिरीची वेल –

मिरी ( Black Pepper Piper nigrum ), पिंपळी (Long Pepper – Piper longum) व पानवेली (Piper betle) एकाच कुळातील आहेत. मिरीची वेल बहुवार्षिक, अनेक फांद्यांची व आधाराने वाढणारी आहे. फांद्या मजबूत, वळणाने वाढणाऱ्या असतात. त्यांच्या पेरांचे जोडावर मुळ्या फुटतात. पाने संपूर्ण, १२.५ ते १७.५ सें.मी. लांब व ५ ते १२.५ सें.मी. रुंद असतात. रुंदीमध्ये बराच फरक आढळतो. फुले बारीक असून तुऱ्यावर लागतात. तेथे मिरीचे दाणे (फळे) तयार होतात. लागवडीच्या वेलीवरील तुयात नर व मादी फुले असतात. मादी फुलांची संख्या अधिक असेल त्या वेलींची उत्पादन क्षमता अधिक असते. दाट सावलीत मादी फुलांची संख्या अधिक असते. पूर्णपणे नर किंवा मादी फुलांच्या वेलीही आढळतात. वेलींची उत्पादन क्षमता ६० ते १०० वर्षे टिकते.

Plantation Of Black Pepper In Marathi

बेण्याची निवड (black pepper farming)-

मिरीची लागवड सलग पीक म्हणून करतात किंवा नारळ, सुपारी, कॉफी, फणस, आंबा, चिंच, साग, चहा ह्यामध्ये मिश्रपीक म्हणून करतात. सलग पीक घेण्याकरिता आधारासाठी जिवंत झाडे वाढवितात किंवा लाकडी खांबावर किंवा दगडी किंवा काँक्रीटच्या खांबावर वेली वाढवितात. मंदार किंवा पांगारा, गुग्गुळ, काकड अगर सिल्व्हर ओक ह्या जिवंत झाडावर वेली वाढवितात. त्यासाठी पावसाळा सुरु होताच एप्रिल, मे महिन्यात २.५ ते ३ मीटर अंतरावरील खड्ड्यात ही झाडे लावतात. त्यांचे शेजारी जुलै ते सप्टेंबर महिन्यात मिरीची लागण करतात. आधाराची झाडे वाढलेली नसतील तर सुरुवातीला बांबूचा आधार देतात. मिश्रपीक घेणे आर्थिकदृष्ट्या अधिक श्रेयस्कर असते.

बियांपासून वाढलेल्या वेलींचे आयुष्य जास्त असते आणि नंतरच्या काळात त्यांचेपासून अधिक उत्पादन मिळते. त्यासाठी पूर्ण वाढ झालेली मिरीची निवडक फळे २-३ दिवस पाण्यात भिजत घालतात. साल हाताने चोळून काढून टाकतात. हे बी सावलीत वाळवितात. गादी वाफ्यावर हे बी पेरतात. रोपांना ४-५ पाने फुटली की त्यांचे बागेत स्थलांतर (लावणी) करतात. पण प्रयोगात असे दिसून आले आहे की बालीसह फळे (बी) पेरली तर उगवण लवकर होते.

मिरीच्या वेलीला २ प्रकारच्या फांद्या वाढतात. वेलीच्या बुडाजवळ वाढणाऱ्या फांद्या (Runners) लावणीसाठी निवडतात. ऑक्टोबर महिन्यात जेव्हा वेलीवर भरपूर फळे असतात, तेव्हा लावणीच्या फांद्यांची निवड करतात. त्यामुळे कोणत्या वेलींची उत्पादनक्षमता अधिक आहे आणि फळांची प्रत कशी आहे, हे समजते, अशा निरोगी वेलींच्या फांद्या निवडून त्या खुणेसाठी एखाद्या लाकडी बेफाटीला गुंडाळून ठेवतात.

त्या फांदीचा जमिनीशी संपर्क येऊ देत नाहीत. नाहीतर अवेळीच त्या फांदीला मुळ्या फुटतील. अशा फांद्या वेलीपासून वेगळ्या करून पुढील वर्षीच्या जुलै महिन्यात २५ ते ४५ सें.मी. लांब व १० ते १२.५ सें.मी. व्यासाचे तुकडे करून लावणी करतात. प्रत्येक तुकड्यावर ४-५ गाठी (Nodes) असतात. किंवा बांबूच्या टोपलीत असे काही तुकडे (बेणे) लावतात. ह्या टोपल्या सावलीत ठेवतात. त्यांना नियमितपणे पाणी देतात. ह्या बेण्याला मुळ्या फुटल्यानंतर शेतात लावणी करतात. प्रति हेक्टरी ७५० ते १००० बेणे लागते. अशा वेण्याचे लागवडीपासून ६ किंवा ७ वर्षानी समाधानकारक उत्पादन मिळते.

महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना 2023 : Kukut Palan Yojana Maharashtra 2023

कर्नाटकात मिरीच्या वेलीच्या शेंड्याकडील फांद्या वेण्यासाठी निवडतात. अशा लागवडीपासून दुसऱ्या वर्षापासून उत्पादनास सुरुवात होते आणि चौथ्या वर्षापासून समाधानकारक उत्पादन मिळते. परंतु शेंड्याकडील फांद्या बेण्यासाठी कापल्याने त्यांच्यापासून मिरीचे उत्पादन मिळत नाही. शिवाय अशा प्रकारे वाढलेल्या नवीन वेलींचे आयुष्य कमी (१५ वर्षे) असते.

मलबार व दक्षिण कॅनरा भागात थोड्या प्रमाणात मिरीची दाब कलमे तयार करतात. त्यासाठी मिरीच्या वेलीच्या बुडाशी वाढणाऱ्या फांद्या १५ ते २० सें.मी. व्यासाच्या बांबूच्या टोपलीतील मातीमध्ये दाबतात. ४ ते ६ आठवड्यात त्या फांद्यांना मुळे फुटतात. त्यानंतर मातृवेलीपासून फांद्या वेगळ्या करून दाब कलमे शेतात लावतात.

पानीयूर (केरळ) येथील संशोधनातून खालील शिफारशी केल्या आहेत-

१) मिरीचे बी सालीसह ३ दिवस वाळविल्यानंतर त्याची पेरणी केल्यास उगवण चांगली होते. बियांची वेलीवरून काढणी केल्यापासून २० दिवसपर्यंत त्यांची उगवणक्षमता टिकते.

२) लावणीसाठी मुळ्या फुटलेले बेणे अधिक चांगले असते. त्याची वाढ जोमाने होते. लावणीसाठी मुळ्या फुटलेले बेणे जानेवारी ते मे महिन्यात तयार करावे. बांबूच्या टोपलीत किंवा अल्काथिनच्या पिशव्यात बेण्यांना लवकर मुळ्या फुटतात.

३) बेण्याचे तुकड्यावर एक गाठ (Node) आणि त्याचे खाली व वर फांदीचा ५ सें. मी. भाग असल्यास त्या बेण्याला चांगल्या मुळ्या फुटतात. ह्या पद्धतीत बेण्याचे खर्चात बचत होते. ४) कलम तयार करताना फांदीच्या शेंड्याकडील गाठीपासून लवकर व चांगली मुळे फुटतात.

५) ५ ते १० वर्षे वयाचे वेलीपासून बेणे घ्यावे.

काळी मिरीच्या जाती –

तेलीचेरी, मलबार, अलेप्पी, (केरळ), लम्पांग, सायगाव, पेनांग, व सिंगापूर, ह्या मिऱ्याच्या व्यापारी जाती आहेत. दक्षिण केरळचे कोट्टनादन, मध्य केरळचे नारायणकोडी, केरळचे करीमुंडा हे उत्तम वाण आहेत. याशिवाय नीलमुंडी, बालनकोट्टा आणि कुथिरवल्ली या जातीही मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. भौतिक व रासायनिक गुणधर्म, रंग, आकार, स्वाद व तिखटपणा, ह्यात या जातींच्या गुणात फरक आहे. तेलीचेरी व अलेप्पी जातीची मिरी ठोसर, आकर्षक गर्द लालसर तपकिरी किंवा काळ्या रंगाची असतात. त्यांचा वास चांगला असतो. भारतातून ह्या जातींची मलबार गार्बलड (MGI) ह्या नावाने ९०% निर्यात होते. लाम्पांग व सिंगापूर जातींची मिरी लहान आकाराची, आकसलेली असतात पण तितकीच तिखट असतात.

भारतात मिरीच्या २४ जातींची लागवड करतात. त्या वेगळ्या ओळखणे कठीण असते. स्थानिक नावाने त्या ओळखल्या जातात. कारीमुंडा, नारायाक्कोडी, घालूवल्ली, वालनकोट्टा, कोट्टानाडन, कुथिरावल्ली, कानिथाक्काडन, अराक्कूलामुंडा, मालीगेसरा, उड्डाघेरे, नीलामुंडी, वेलुथानाम्वन अशा काही प्रसिद्ध जाती आहेत. त्यापैकी कारीमुंडा ही जात मध्य केरळात लोकप्रिय आहे. ह्या जातीचे लोंगर ४ सें.मी. ते १० सें.मी. लांब ( सरासरी ६.५ सें.मी.) असून ती उत्पादनाला चांगली आहे, वाळलेली मिरी ३५% मिळतात. फुलांचा बहार मे येतो. ओलीताच्या वेलींना सतत फुले येतात. आंतरपिकासाठी व दाट जून महिन्यात लागवडीसाठी ही जात चांगली आहे. उत्तम प्रतीच्या दृष्टीने कोट्टानाइन ही जात ओलिओरेसीन बनविण्यास ( १७.८ टक्के ) उत्तम आहे.. त्या खालोखाल ऐम्पीरीयान (१५.७टक्के ) ही जात आहे.

पानीयूर – १

कोकणात लागवडीसाठी पानीयूर १ या संकरित वाणाची शिफारस कोकण कृषी विद्यापीठाने केली आहे. ह्या जातीच्या वेली जोमाने वाढतात. पाने मोठी असतात. लोंगर लांब असतात. फळे टपोरी आणि भरलेली असतात. उघड्या शेतात लागवड केल्यास खूप उत्पादन मिळते. फलधारणा लवकर होते. वाळल्यानंतर ३६% मिरी मिळतात. ह्या मिऱ्यामध्ये ओलिओरेझिन ९.५%, पीपरीन ३.६%, तेल ३.५% व स्टार्च ३५% असतात. ही जात आंतरपिकासाठी योग्य नाही. सावलीत व खूप नत्राने खतावलेल्या जमिनीत वाढणाऱ्या वेलींना कमी फुले लागतात. आणि उत्पादन कमी मिळते. पात्रीयूर येथील प्रयोगात या जातीच्या एका वेलीपासून सरासरी २.२ कि.ग्रॅ. मिरी (६.३ कि.ग्रॅ. हिरवी) मिळाली आहेत.

याशिवाय मिरीच्या पात्रीयूर २, पानीयूर ३, पात्रीयूर ४ व पात्रीपूर ५ अशा सुधारित जाती आहेत. त्यांचेपासून प्रति हेक्टरी उत्पादन १२७० लावणी २५७० किलो मिळते.

लावणी (black pepper plantation) –

बागेत मिरीच्या वेण्याची लावणी जुलै ऑगस्ट महिन्यात करतात.

वेलीतील अंतर ३ मीटर x ३ मीटर ठेवावे. आधारासाठी लावलेल्या झाडाजवळ ४५ सें.मी. खोल अर्धगोलाकार खड्डे करतात. हे खड्डे झाडाच्या उत्तर व उत्तर पूर्व दिशेला असावे. म्हणजे पश्चिमेच्या उन्हाचा वेलीवर परिणाम होणार नाही.

अर्धा खड्डा भरेपर्यंत त्यात जंगलातील माती घालतात. एका खड्यात ३ ते ७ मुळ्या न फुटलेले बेणे घालतात. त्यापैकी मुळ्या फुटलेली दोन जोमदार रोपे कायम ठेवून बाकीची काढून टाकतात. किंवा नांगे भरण्यासाठी वापरतात.

मुळ्या फुटलेले काही बेणे एका खड्डयात लावतात. त्यावर माती दाबून जमिनीवर लहानसा उंचवटा करतात. म्हणजे रोपाजवळ पावसाचे पाणी साचणार नाही. ही रोपे जोमाने वाढतात.

पहिल्या वर्षात वेली एक ते दीड मीटर उंच वाढतात. पहिली ३/४ वर्षेपर्यंत ह्या वेली आधाराचे झाडावर ३० सें.मी. अंतराने बांधाव्या लागतात.

महाराष्ट्र राज्य स्मार्ट रेशन कार्ड २०२३ 

लावणी केल्यापासून मिरीच्या वेली ८ ते १५ वर्षे चांगले उत्पादन देतात. त्यानंतर त्यांचे उत्पादन कमी होत जाते. वीस वर्षांच्या वेलींचा जोम कमी होतो आणि उत्पादन घटते.

अशा वेली काढून टाकून तेथे पुनः नवीन बेणे लावावे (पुनर्लावणी). मलेशिया व ब्राझीलमध्ये दर १५ वर्षांनी जुन्या वेली काढून तेथे नवीन वेली लावतात. त्यामुळे त्यांचे काळ्या मिरीचे प्रति हेक्टरी उत्पादन ४,००० कि.ग्रॅ. आहे. आणि आपल्याकडे सरासरी प्रति हेक्टरी २७० कि.ग्रॅ. आहे.

पीक तणरहीत ठेवण्यासाठी खांदणी व खुरपणी केली पाहिजे, जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीचे बांध घातले पाहिजेत किंवा टेरेसिंग केले पाहिजे.

सुपारीच्या बागेत मिरीची लागवड करता येते, त्यासाठी सुपारीची झाडे २.७ बाय २.७ मीटर अंतरावर लावलेली असावीत. पानीयूर – १ ही जात निवडावी.

झाडे नियमित अंतरावर लावलेली नसल्यास व झाडांची दाट सावली पडत असल्यास कारीमुंडा ही जात निवडावी.

सुपारीची झाडे दाट लावली असतील आणि घनदाट सावली पडत असल्यास अशा बागेत मिरीची लागवड करू नये. १० वर्षे वयाच्या व ७.८ मीटर उंच वाढलेल्या सुपारीच्या बागेत मिरीची लागवड करावी.

ती झाडे निरोगी असावीत. सुपारीच्या झाडापासून उत्तर-पूर्व दिशेला पाऊण मीटर अंतरावर ३० घन सें.मी. खड्ड्यात मुळ्या फुटलेल्या २ किंवा ३ काड्या लावाव्यात. पावसाळ्याचे अखेरीस लागवड करावी.

पहिल्या वर्षी वेलीच्या बुडाशी वाळलेल्या पानांचे आच्छादन द्यावे. त्यांचे उन्हापासून संरक्षण करावे. वेली २ मीटर उंच वाढल्या की त्या सुपारीच्या खोडापासून काळजीपूर्वक वेगळ्या करून त्याच खोडाभोवती गुंडाळाव्यात.

नवीन फूट खोडाला बांधावी. ४ वर्षात वेली ५ ते ६ मीटर उंच वाढतात. वेली सहा मीटरपेक्षा अधिक उंच वाढू देऊ नयेत. त्यांची शेंड्यावर छाटणी करावी.

खते (black pepper plant care) –

जास्त सावली व जास्त नत्रखते दिल्याने वेलीची पालेवाढ होऊन उत्पादन घटते. केरळात सामान्य शेतकरी मिरीच्या वेलींना खते घालीत नाहीत, त्यामुळे कमी उत्पादन मिळते.

मिरीच्या प्रत्येक वेलीला लावणीनंतर तिसऱ्या वर्षानंतर १० कि.ग्रॅ. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट पावसाळा सुरू होताच द्यावे. शिवाय सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक वेलीस १००ग्रॅ. नत्र, ४०ग्रॅ. स्फुरद, व १४० ग्रॅ. पालाश मिळेल अशी खते दोन समान मात्रेत एप्रिल मे आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात द्यावीत.

ही पोषण द्रव्ये शक्यतो रॅलेमील, निंबोळी पेंड या सेंद्रीय खतातून द्यावीत. वरील मात्रेच्या १/३ खते पहिल्या वर्षी व २/३ खते दुसऱ्या वर्षी घालावीत, त्याशिवाय एका वर्षाआड एप्रिल-मे महिन्यात प्रत्येक वेलीसाठी ५००ग्रॅम चुना जमिनीत मिसळल्यास फायदा होतो.

खते वेलीच्या बुडापासून ३० सें.मी. अंतरावर देऊन मातीच्या. जाड थराने झाकावीत. मुळांना रासायनिक खतांचा प्रत्यक्ष स्पर्श होऊ देऊ नये, डिसेंबर ते मार्च महिन्यात वेलींना पाणी दिल्याने ९०% उत्पादन वाढते.

काळी मिरी कीड व रोग नियंत्रण

१. फुलकिडे (थ्रीप्स):

रस शोषक कीड बहाराचे नुकसान करतात. त्यांचे नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी १५ किलो ग्रॅम बीएचसी भुकटी १०% धुरळावी आणि ०.०३% डायमेथोएट किंवा ०.०५% मोनोक्रोटोफॉस महिन्यातून एकदा आलटून पालटून फवारावे. हाच उपाय पाने खाणाऱ्या अळीकरिता करावा.

२. पोलू भुंगेरे (पेपर फ्ली बीटल):

ह्या भुंगेऱ्याची फिकट पिवळ्या रंगाची अळी पक्क झालेल्या फळात शिरते आणि आतील बी खाते. त्यामुळे फळे पोकळ बनतात. उत्पादनात ३० ते ४०% घट येते. भुंगेरे चकाकीत पिवळ्या निळ्या रंगाचे व ३ मि.मी. लांब असतात, ते कोवळ्या हिरव्या फळाच्या सालीच्या आत एकेक अंडे घालतात.

३. मर – काळी मिरी रोग नियंत्रण :

मिरी वेलींना होणारा प्रमुख रोग म्हणजे मर (क्विक विल्ट किंवा फुट रॉट) जूनच्या अखेरीपासून सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत हा रोग येतो. तेव्हा वातावरण रोगाचे प्रसारास पोषक असते, या रोगामुळे पाने सडतात, वेलीचे बुडुख (कॉलर) व मुळे सडतात.

४. लो विल्ट :

या रोगाने वेली हळूहळू सुकत जातात. मुळ्या सुकतात. त्यासाठी जमिनीत भरपूर ओलावा असतांना मे-जून व ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक वेलीस ३० ग्रॅम फोरेट जमिनीत मिसळून द्यावे.

५. पोलू :

पाने, कोवळ्या फांद्या, लोंगर व फळावर बुरशी आढळते. त्यामुळे पाने गळतात. कोवळ्या फांद्या गर्द तपकिरी दिसतात. कोवळे लोंगर सडतात, गळतात. फळे आकसतात, त्यांची साल तडकते. पावसाळ्याचे अखेरीस हा रोग पिकांवर आढळतो.

६. बारीक पानांचा रोग :

या रोगामुळे वेलींचे पैरे आखूड झालेले दिसतात. वेलींची पाने लहान व अरुंद झालेली दिसतात. ती चामड्यासारखी, पुरळ उठलेली व नागमोडी दिसतात.

७. फायलाडी रोग :

या रोगाची बाधा झालेल्या वेलीवरील पुष्पगुच्छ व फुले विकृत झालेली दिसतात. काही फुलांच्या कळ्यांचे रुपांतर अरुंद पानासारख्या अवयवात झाल्याचे दिसते. रोगाचा प्रादुर्भाव वाढला की, पाने पिवळी पडतात आणि वेलींचे पैरे आखूड बनतात. रोगाचा भर जास्त झाल्यास वेलीपासून फळांचे उत्पादन मिळत नाही.

८. सूत्रकृमी (नेमॅटोड) :

नर्सरीत लावलेल्या वेण्याच्या मुळ्यावर दोन प्रकारच्या सूत्रकृमी हल्ला करतात. मुळ्यावर सूत्रकृमीच्या गाठी आढळतात. त्यामुळे वेलींची नीटपणे वाढ होत नाही. पाने पिवळी पडतात. कधीकधी पानांच्या शिरामधील भाग पिवळा दिसतो. असे बेणे बागेत लावल्यास त्यांची वाढ चांगली होत नाही. सौम्य प्रमाणात जरी बेण्याच्या मुळ्यात सूत्रकृमी राहिल्या तरी वेलींची वाढ खुंटते,

९. खवले कीटक :

ही कीड कधीकधी उंच प्रदेशातील मिरीच्या वेलीवर आणि नर्सरीतील शिल्लक राहिलेल्या बेण्यावर आदळते. कले कीटकांचा थर खोड, पाने व फळावर दिसतो. ते रस शोषण करतात, त्यामुळे वेलीचे अवयव वाळतात. मादी खवले कीटक एका जागीच वेलीला चिकटून राहतात.

पीक संरक्षणाचे वेळापत्रक

जलद व हळुवार मर आणि इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी पावसाळा सुरू होताच सुरुवातीला संपूर्ण वेलावर आणि त्यानंतर २० दिवसांच्या अंतराने दोन वेळा १ टक्का बोर्डो मिश्रण फवारणी करावी. तसेच १० टक्के बोर्डो पेस्ट १ मीटर उंचीपर्यंत वेलीवर लावावी. रोगट पाने व मेलेल्या वेली मुळासह काढून जाळून टाकाव्यात.

काळी मिरी पिकावरील आजार आणि संपूर्ण उपाययोजना साठी इथे क्लिक करा

लावणीपासून तिसऱ्या वर्षी वेलीच्या उत्पादनास सुरुवात होते. एका वेलीपासून दरवर्षी अर्धा किलो वाळलेली मिरी मिळतात. वेलीचे वय वाढते तसे उत्पादन वाढते. १० ते २५ वर्षापर्यंत उत्पादन मिळते. मात्र १३ व्या वर्षापासून उत्पादन घटत जाते.

काढणी :

मिरीच्या वेलीवरील पूर्ण वाढीच्या लोंगरावर एखादे जरी फळ पिवळसर किंवा लालसर रंगाची छटा असलेले आढळले की तो संपूर्ण लंगर काढून घ्यावा. अशा प्रकारे वेलीच्या आधाराचे झाडाला शिडी लावून लोंगर गोळा करावे. त्यातील दाणे वेगळे करावेत. टपोरे निरोगी दाणे वेगळे करावे. पातळ मलमलीच्या कापडात ही फळे बांधून ती पुरचुंडी दोन मिनिटे उकळत्या पाण्यात बुडवून काढावी. त्यानंतर चटईवर पातळ थरात पसरुन उन्हात किंवा सावलीत वाळवावीत. वाळलेली मिरी पॉलिथिनचे अस्तर लावलेल्या पोत्यात भरावी.

मिरीची वर्षातून दोन पिके मिळतात.

१. ऑगस्ट सप्टेंबर

२. मार्च-एप्रिल :

परसबागेत मिरीची लागवड

  • बागेत मिरीची लागवड करतात तेव्हा वेलींना आधारावर वाढू देतात. हा आधार जिवंत झाडांचा किंवा निर्जीव आधार ( काँक्रीटचे खांब, ग्रेनाईटचे खांब किंवा सागाच्या बल्ली ) असतो.
  • या आधारावर वाढलेल्या वेलीला दुय्यम फांद्या वाढतात आणि त्यांना फुले व फळे (मिरी) लागतात. या वेलींची अभिवृद्धी ( एक किंवा चार डोळ्यांच्या) बेण्यापासून करतात.
  • बेण्यासाठी धावत्या खोडाचे (स्नर) किंवा चढणाऱ्या फांद्यांचे तुकडे वापरतात. परंतु लागवडीसाठी फळधारणा होणाऱ्या फांदीचे तुकडे वापरल्यास वेलीची वाढ झुडुपाप्रमाणे ठेंगणी होते.
  • या झुडुपांना जास्तीत जास्त फळधारणेच्या फांद्या येतात. त्यामुळे मिरीचे उत्पादन वाढते. या झुडुपाला लागवडीच्या वर्षातच फुले लागतात.
  • योग्य खते व पाणी दिल्याने युडपाला वर्षभर सतत फुले लागतात. ही झुडुपे परसबागेतील कुंड्यात किंवा कुंपणाजवळच्या ओळीत (जमिनीत) लावता येतात. त्यामुळे परसबागेची शोभा वाढून मिरीचे उत्पादन मिळते.

जाती:

परसबागेत लागवडीसाठी सर्व जाती उपयोगी पडतात. परंतु कारीमुंडा, पानीयुर-१ कुथिरावल्ली, कालुवल्ली, अम्पीरियान व कोडानाडान या जातींच्या वेली आकर्षक असतात.

सरकारी योजना

  • काळी मिरीची रोपे शेतक-यांना क्षेत्र विस्‍तावर आणि आंतरपिक कार्यक्रमासाठी 50 टक्‍के अनुदानावर रुपये 0.75 प्रती कलम या दराने देण्‍यात येतात.
  • नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार होण्‍याच्‍या दृष्‍टीने मिरीचे अधिक उत्‍पन्‍न देणा-या व चांगली प्रतीक्षा व गुणधर्म असलेल्‍या जातीचे व 100 कलमांचे प्रात्‍याक्षिक प्‍लॉट स्‍थापन करण्‍यासाठी शेतक-यांना तीन वर्षापर्यंत अनुक्रमे रू. 225 रू. 140 व रू. 150 असे अनुदान देण्‍यात येते.
  • काळी मिरीची आंतरपीक म्‍हणून चांगली लागवड करणे प्रकारची लागवड करण्‍यासाठी नारळ / सुपारीची कमीत कमी सात वर्षाची झाडे असणा-या काळी मिरीची कमीत कमी 30 त जास्‍तीत जास्‍त 200 रोपे विनामुल्‍य पुरविण्‍यात येतात.

FAQ

काळी मिरी काशापासून बनते ?

काळी मिरी म्हणजे पायपर निग्रम (Black Pepper Piper nigrum) असून मिरीची वेल बहुवार्षिक, अनेक फांद्यांची व आधाराने वाढणारी आहे. या वेलीच्या लहान वाळलेल्या बेरीपासून (मिरपूड) मिळते. मिरपूड हे नाव लांब मिरची, पिपली या संस्कृत नावावरून आले आहे. या शब्दाने ग्रीक पेपेरी आणि लॅटिन पाइपरला जन्म दिला आहे

मिरपूड कुठे पिकते ?

भारतीय मिऱ्यांचे ९६% उत्पादन केरळात होते. जगात भारताचा पाचवा क्रमांक लागतो. आज इथिओपिया ने मिरचीचा सर्वात मोठा उत्पादक होण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत आणि जगभरातील एकूण मिरपूड उत्पादनापैकी जवळजवळ एक तृतीयांश उत्पादन व्हिएतनाम मध्ये होते

black pepper meaning in hindi ?

काली मिर्च (Marich Herb) एक औषधीय खडा मसाला (Spice) है। इसे gol mirch या king of spices भी कहते हैं। यह दिखने में छोटी, गोल और काले रंग की होती है।

black pepper meaning in marathi ?

black pepper ला मराठीमध्ये काळी मिरी म्हणून ओळखले जाते. यालाच मासल्यांचा राजा किंवा मासल्यांची राणी असेही म्हणतात.

निष्कर्ष : Conclusion

शेतकरी मित्रहो, आज आम्ही तुम्हाला काळी मिरी लागवड माहिती या आमच्या लेखातून काळी मिरी जाती, लागवड, रोग, उपाय, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आम्ही अपेक्षा करतो कि हि माहिती तुम्हाला समजली असेल. तुम्हाला सदर माहिती आवडली असेल तर आम्हाला कॉमेंट द्वारे कळवा आणि इतराना देखील FACEBOOK, Whats’app वर शेअर करा.

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button